सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यात मंगळवारी (दि.२१) रात्री सर्वदूर पाऊस झाल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले. तर यंदा तालुक्यात पहिल्यांदाच एकसंघ पाऊस झाला. पिकांना पाण्याची नितांत गरज असताना वरुणराजा बरसल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तालुक्यात यंदा पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे पेरणी उशिरा झाली. भाग बदलत टप्याटप्याने पाऊस पडला. यामुळे पेरणीही टप्याटप्याने झाली. तर तालुक्यात ९३ टक्केच पेरणी पूर्ण झाली आहे. फरकाने पडणाऱ्या पावसावर पिके उभी राहिलेली असताना पावसाने खंड दिला. यामुळे उगवून आलेली पिके सुकू लागली होती.
मात्र मंगळवारी रात्री उपयुक्त पाऊस झाला व पिकांना जीवदान मिळाले. पावसाळा लागून दीड महिना झाला. तरी अद्याप तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी खेळणा, केळगाव, अंधारी, चारनेर अजिंठा पेंडगाव, निल्लोड धरणांमध्ये पाण्याची आवक झालेली नाही. धरणे कोरडी पडली होती. तर ४५ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. सध्या ही २२ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पाणीटंचाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. तालुक्याला दमदार पावसाची गरज असून, धरणे अद्यापही कोरडीच आहेत.
----
तालुक्यात झालेला पाऊस
मंडळाचे नाव
झालेला पाऊस
सिल्लोड
४७ मि.मी
भराडी
३७ मि.मी
अंभई
३७ मि.मी
अजिंठा
३९ मि.मी
गोळेगाव (बु.)
३३ मि.मी
आमठाणा
४२ मि.मी
निल्लोड
२८ मि.मी
बोरगाव बाजार
३० मि.मी
एकूण सरासरी
३६ मि.मी












